। अलिबाग । प्रतिनिधी ।
भावा-बहिणीचे अतुट नाते असणारा रक्षाबंधन सण रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि.19) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एक वेगळा उत्साह एकमेकांच्या चेहर्यावर दिसून आला.
बहिण भावाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सणानिमित्त महिलांची राखी खरेदीची लगबग बाजारात दिसून आली. अखेर तो दिवस सोमवारी उजाडला. काही महिलांनी सकाळी तर काही महिलांनी सायंकाळी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. सोमवारी शाळांना सुट्टी असल्याने अनेक शाळांमध्ये शनिवारीच हा दिवस साजरा करण्यात आला. तसेच, समाजातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यातील पोलिसांनादेखील महिलांनी राखी बांधली. तसेच, अलिबागमधील जिल्हा कारागृहातील कैद्यांनादेखील राखी बांधण्यात आली.