राम बाबूने गाठली पॅरिसची पात्रता

ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारा भारताचा 17वा अ‍ॅथलिट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

स्लोव्हकियातील डुडिन्स्का येथे झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत राम बाबू याने पॅरिस ऑलिंपिकची पात्रता गाठली आहे. चालण्याच्या शर्यतीत पॅरिसची पात्रता गाठणारा तो एकूण सातवा भारतीय अ‍ॅथलिट होय.

आशियाई क्रीडा स्पर्धेत 35 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक जिंकणार्‍या राम बाबूने एक तास 20 मिनिटे अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ देताना ही पात्रता पार केली. पॅरिससाठी एक तास 20 मिनिटे 10 सेकंद अशी पात्रता आहे. स्लोव्हकियातील स्पर्धेला जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने ‘गोल्ड लेव्हल’चा दर्जा दिला होता. त्यामुळे यातील कामगिरी ऑलिंपिक पात्रतेसाठी गणली गेली. या स्पर्धेत त्याने ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय होय. पेरूचा सेसार रॉड्रीग्ज एक तास 19 मिनिटे 41 सेकंदात सुवर्ण तर इक्वेडोरचा ब्रायन पिंटाडो एक तास 19 मिनिटे 44 सेकंदात रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

सातवा अ‍ॅथलिट
पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आतापर्यंत सात अ‍ॅथलिटे पात्रता गाठली असून त्यात 24 वर्षीय राम बाबूचाही समावेश आहे. अक्षदीप सिंग, सुजर पन्वर, सेर्विन सॅबेस्टियन, अर्शप्रित सिंग, परमजित बिश्त, विकास सिंग हे अन्य अ‍ॅथलिट आहेत. महिला विभागात फक्त प्रियांका गोस्वामीला आतापर्यंत पात्रता गाठता आली आहे. गेल्यावर्षी झारखंड येथील स्पर्धेत तिने ही पात्रता गाठली होती. सात अ‍ॅथलिटने पात्रता गाठली असली तरी त्यापैकी फक्त तिघांचीच निवड केल्या जाणार आहे. यासाठी अंतिम चाचणी जून महिन्यात होईल, असे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले.
कामगाराचा मुलगा
अतिशय कठीण परिस्थितीत राम बाबूने हे यश संपादन केले असून तो एका कामगाराचा मुलगा होय. आपला खर्च भागविण्यासाठी त्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात वडिलांसोबत तो मनरेगा योजनेतही कामाला गेला होता.

सुरुवातीला तो पाच व दहा हजार मीटर शर्यतीत भाग घेत असे. प्रशिक्षक प्रमोद यादव यांच्या सल्ल्यानुसार तो चालण्याच्या शर्यतीत भाग घेऊ लागला. तो सुरुवातीला 50 आणि नंतर 35 किलोमीटर शर्यतीत भाग घेऊ लागला. पॅरिससाठी त्याने 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित केले आहे.

Exit mobile version