जिल्ह्यात रामनवमी साजरी

रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि.17) रामनवमी निमित्त ठिकठिकाणी राम जन्मकाळ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची विधिवत पूजा अर्चा करून, श्रीरामांच्या जन्मावर किर्तनाचे आयोजन करत पालखी मिरवणूक काढण्यात आल्या.


मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अमृतेश्‍वर मंदीरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. अमृतेश्‍वर मंदीरात प्रभू श्रीराम मुर्तीची विधिवत पूजा अर्चा व अभिषेक करण्यात आला. यावेळी पाली येथील प्रसिद्ध किर्तनकार तृप्ती मराठे यांचे श्रीराम जन्मावर किर्तन झाले.


नागोठण्यातील व परिसरातील सर्वच श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच नागोठण्यातील नवीन रामेश्‍वर मंदिरातही श्रीरामनवमीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

मुरुडमधील एकदरा कोळी समाज व महिला मंडळ मुंबई रहिवासी आयोजित रामनवमी निमित्त राम जन्मकाळ गेली 61 वर्ष मोठ्या उत्साहात साजरा करतात. गावकरी सर्व हेवेदावे विसरून सकाळपासून रामाच्या मंदिरात जमतात. यावेळी 2 हजार गावकरी व मुरुडकर जन्मकाळसाठी देवळात सहभागी होतात.


पनवेलच्या बल्लालेश्‍वर मंदिरात श्री रामनवमी निमित्त रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलावर्ग, लहान मुले, तसेच जेष्ठ नागरिकांचा सहभाग होता.


रामनवमी निमित्त अलिबागमधील श्री राम मंदिरात ब्राम्हण उत्कर्ष मंडळाच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार श्री. अय्यर यांनी भविकांना कीर्तनरूपाने श्री राम जन्माची कथा कथन केली.


खांदा वसाहतीच्या बाजूला आसुड गांव येथे नव्याने राम मंदिर उभे करण्यात आले आहे. हे मंदिर दगडावर उभे कोरण्यात आले असून राम नवमीनिमित्त कीर्तन तसेच, राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

Exit mobile version