ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांकडून नमाज पठण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महिनाभर खडतर रोजा (उपवास) केल्यानंतर सोमवारी (दि.31) रायगड जिल्ह्यातील मुस्लीम समाजाच्यावतीने रमजान ईद साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्ह्यात 252 ठिकाणी हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज पठण केले. अनेकांनी गळाभेट आणि शुभेच्छा देत ईद उत्साहात साजरी करण्यात आली. रमजान ईद हा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. यानिमित्त वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्यावतीनेदेखील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
रमजान ईद निमित्त महिनाभर रोजा (उपवास) करण्यात आला होता. जिल्ह्यातील 40 वर्षावरील मुस्लीम बांधवांसह दहा व त्यापेक्षा अधिक वयोगटातील मुलांनीदेखील उपवास केला होता. चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी करण्यास सुरुवात झाली. त्याची तयारी जिल्ह्यात सुरु होती. एक वेगळा उत्साह मुस्लीम समाजामध्ये दिसून आला.

यावेळी मुस्लीम बांधवांनी सकाळी नवीन कपडे परिधान करून अलिबागमधील जामा मशिदीबरोबरच जिल्ह्यातील 232 मशिदी तसेच 21 दर्गे या ठिकाणी गर्दी केली. सर्वांनी एकत्र येऊन सामुहिक नमाज पठण केले. त्यानंतर एकमेकांना भेटून एकमेकांंना रमजान ईदीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शीरखुर्मा या गोड पदार्थासह बिर्याणी, पुलाव या पदार्थांचा आस्वादेखील घेण्यात आला. रायगड पोलिसांनीदेखील ठिकठिकाणी जाऊन मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रमजान महिन्याचे रोझे संपल्यावर रमझान ईद सणानिमित्त पनवेलच्या ईद गाह येथे मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रमझान ईद निमित्त पनवेलच्या मुस्लिम नाक्यावरील मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यात आला. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचबरोबर पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमझान ईदच्या शुभेच्या दिल्या

महाड तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी महाड मधील जामा मस्जिद येथे सकाळी 8 वाजता नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर सणाचा आनंद पाहायला मिळत होता.

अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे रमजान ईद साजरी करण्यात आली. ईद निमित्त पोयनाड पोलीस ठाण्याचे दराडे व कर्मचारी यांनी मुस्ताक ग्रुप व श्रीगावमधील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

बेणसेत रमजान ईदनिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. येथील मस्जिद मध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध व सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित येत शांतता पूर्ण व एकोपा जोपासत ईदचा आनंद द्विगुणित केला. यावेळी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईद सण साजरा केला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

कर्जत शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कर्जत शहरातील मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून सुगंधी अत्तर लावून ईद साजरी करण्यासाठी सकाळी सुन्नी जामा मस्जिदमध्ये पोहचले होते. यावेळी मस्जिदमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आले. नमाज अदा झाल्यावर मुस्लिम बांधवांनी मस्जिद बाहेर एकमेकांना मिठ्या मारून शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


माणगाव तालुक्यात सर्वत्र ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी मस्जितमध्ये सामुदायिक नमाज अदा केल्यावर गळाभेट देत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मस्जिदमध्ये रमजान इदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व त्यांचे सहकारी यांनी गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
लहानग्यांनी मिळवला पहिल्या रोजाचा मान
इस्लाम धर्मात ईमान, नमाज, रोजा, जकात, हज ही पाच मूलभूत तत्वे मानली जातात. त्यापैकी रमजान महिन्यातील रोजा हा एक आहे. इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिना सुरु होतो. यावर्षी 2 मार्चपासून रमजान रोजे सुरु झाले होते. हे रोजे अत्यंत कडक असतात. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात दरवर्षी हे रोजे महिनाभर धरीत असतात. यावर्षी मार्च महिन्याच्या कडक उष्म्याने नागरिक हैराण होत होते. या परिस्थितीत माणगाव व म्हसळा तालुक्यातील अत्यंत कोवळ्या वयातील लहानग्यांनी रमजानचे सर्व रोजे यशस्वीरीत्या पूर्ण करून ते पहिल्या रमजानचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

म्हसळा तालुक्यातील वरवठणे येथील इर्शाद शिरशिरकर यांची कन्या आदिना शिरशिरकर हिने वयाच्या दहाव्या वर्षी तर म्हसळ्यातील मुनाफ शेख यांचा पुत्र मुंतसर शेखने वयाच्या अकराव्या वर्षी पवित्र रमजानचे सर्व रोजे (उपवास) यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

माणगाव तालुक्यातील लोणशी मोहल्ला येथील जमीर ढांगू यांचा पुत्र जिलाल ढांगूने वयाच्या नवव्या वर्षी, जुने माणगाव येथील अफझल अबुबकर ताज यांची कन्या सिफा ताज हिने वयाच्या सातव्या वर्षी, हनीफ अनवारे यांचा पुत्र दानियाल अनवारे याने वयाच्या सातव्या वर्षी, फहद महामूद धुनवारे यांचा पुत्र समी धुनवारे याने वयाच्या सातव्या वर्षी, जुहेब उमर परदेशी यांचा पुत्र फराझ परदेशी याने वयाच्या नवव्या वर्षी पवित्र रमजानचे सर्व रोजे (उपवास) यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. त्यांचे माणगाव तालुक्यातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.