पालीत एटीएमची सुरक्षा रामभरोसे

ग्राहकांपेक्षा गुरांचा वावर जास्त
। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम गुरांचा गोठा बनल्याने तेथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे ग्राहकांमधून बोलले जात आहे. शहरात राम आळी शेजारील असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ग्राहकांपेक्षा गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. तेथे सुरक्षारक्षक नसल्याने केबीनमध्ये मोकाट गुरे पावसापासून आपले संरक्षण करण्यासाठी आसरा घेताना दिसत आहेत. मात्र, तरी देखील बँक व्यवस्थापक डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत की काय? असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

याशिवाय बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना पैसे काढण्यासाठी इतर बँकेच्या एटीएममध्ये जावे लागल्याने संताप व्यक्त करताना दिसत आहेत. या मोकाट गुरांनी आपला बस्तान एटीएम केबीनमध्ये मांडल्याने खातेधारक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना माघारी फिरावे लागत आहे.


बँक ऑफ इंडिया पाली शाखेतील व्यवस्थापकांनी एटीएमसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी आणि ग्राहकांना नाहक होणार्‍या त्रासापासून मुक्ती द्यावी.

– रविंद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली

गुरांच्या ठिय्यामुळे ग्राहकांना इतर बँकेच्या एटीएमचा आधार घेऊन खिशाला कात्री मारावी लागते. केवळ व्यवस्थापकांच्या नाकर्तेपणामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

– भगवान शिंदे, ग्राहक
Exit mobile version