कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या जखमी कुत्र्यांनमुळे पालीतील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण आहे. पाली शहरातील ठिकठिकाणी फिरणार्या या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पालीतील हटाळेश्वर चौक, बाजारपेठ, बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ व सर्व आळ्यांमध्ये तसेच कचरा कुंड्यांजवळ भटक्या व मोकाट कुत्र्यांचा झुंडीत वावर असतो. त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रात्री व दिवसादेखील हे कुत्रे टोळक्याने फिरतात. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन दिसले की थेट त्यांच्यावर धावून जातात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भटक्या कुत्र्यांमध्ये कधीकधी जुंपते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणार्या वाहनांना अपघात होण्याचा धोकादेखील वाढला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालीत मोकाट व भटक्या कुत्रांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले, वृद्ध व महिलांना या कुत्र्यांची सर्वांत जास्त भीती आहे.नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन लवकर उपाययोजना करावी.
– प्रकाश पालकर, सामाजिक कार्यकर्ते
पाली नगरपंचायत मोकाट कुत्रे व गुरे यांच्या बाबत लवकरच उपाययोजना हाती घेणार आहे.
– विद्या येरूणकर, मुख्य अधिकारी, पाली नगरपंचायत