उरणमध्ये अस्वच्छतेचा सुळसुळाट?

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू; संबंधित विभागांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, बेकरीमधील पदार्थ, अस्वच्छ हॉटेल व्यवसायाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असतानाही अन्न व औषध प्रशासन, नगरपालिका आणि इतर संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे.

राज्यात गुटखा बंदी असतानाही उरणमध्ये अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. अधूनमधून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र, या अवैध व्यवसायामागील मोठे पुरवठादार आणि गुटखा माफियांपर्यंत कारवाई पोहोचत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणारे दूध, दही, ताक, लस्सी, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हजारो नागरिक दररोज वापरत असलेल्या या पदार्थांची नियमित नमुना तपासणी होत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे चिकन, मटण, मासे, मिठाई, बेकरी पदार्थ, चायनीज खाद्यपदार्थ, फास्टफूड आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहेत.

विशेष म्हणजे, अनेक हॉटेल्स, बार आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांच्या स्वयंपाकगृहांची परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी ड्रेनेजच्या टाक्यांच्या शेजारी अथवा त्यावरच किचन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. निकृष्ट दर्जाचे व खराब साहित्य वापरून खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचे आरोप होत आहेत. रस्त्यांवर खुलेआम विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

याशिवाय काही मेडिकल स्टोअर्स आणि खासगी दवाखान्यांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. अनावश्यक औषधांची विक्री, महागड्या चाचण्या आणि अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची चर्चा असून, याबाबतही चौकशीची मागणी होत आहे. मात्र, तक्रारींनंतरही व्यापक स्वरूपाची कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने संबंधित विभागांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळखोरी आणि अवैध व्यवसायांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता उरणकरांची मागणी आहे की, आयुक्तांनी कोणतीही पूर्वसूचना न देता उरण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवावी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून उरण तालुक्यातील अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

सखोल चौकशीची मागणी
गुटखा विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्स, बार, चायनीज सेंटर, चिकन-मटण विक्री केंद्रे, मेडिकल स्टोअर्स, खासगी दवाखाने आणि संबंधित शासकीय विभागांच्या कामकाजाची सखोल चौकशी करावी.
Exit mobile version