स्वतःच्या स्वार्थासाठीच राणे कुटुंबीय भाजपात

आ.वैभव नाईक यांचा आरोप
राणे कुटुंबीयावर ठेवला गद्दारीचा ठपका
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
स्वतःच्या स्वार्थासाठीच राणे कुटुंबीय भाजपात दाखल झाल्याचे प्रतिपादन शिवसेना आ.वैभव नाईक यांनी केले आहे. कणकवली येथील विजयभवन येथे बोलत असताना राणे कुटुंबीयावर प्रत्येक व्यक्ती तथा पक्षासह गद्दारी केल्याचा घणाघाती आरोप नाईक यांनी केला आहे.
मागीन निवडणुकांमध्ये सेना-भाजप पक्षांमध्ये निर्माण झालेले वैमनस्य तळ गाठू लागले आहे. राज्यात ठिकठिकाणी आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच दक्षिण कोकणात सेना-भाजप वाद दिवसागणिक राजकीय तापमान वाढवत आहेत. उभय पक्षातील नेते, पदाधिकारी परस्परांवर चिखलफेक करायची एकही संधी हातची जावून देत नाहीत. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांनी राणे कुटुंबास विशेष लक्ष्य केल्याचे चित्र विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये प्रतिरोज पाहावयास मिळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर सेना आ.वैभव नाईक यांनीही राणे कुटुंबीयावर घणाघाती टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्ह्यात मेळावे घेत निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही, बघून घेई, अशा भाषेत ते भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. मात्र, नारायण राणे यांनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नसल्याचे प्रतिपादन आ.नाईक यांनी केले आहे.
आ.नाईक पुढे म्हणाले की, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण राणेंबरोबर नसल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. तसेच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नसल्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न राणे करत आहेत.
तसेच, सत्ता असेल त्या पक्षात राणे प्रवेश करतात. राणे स्वतः सत्तेचा उपभोग घेत, आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत असल्याचे आता स्पष्ट उघड असल्याचेही नाईक म्हणाले.
याशिवाय, राणे कुटुंबीयांच्या राजकीय कृतीचा पाढा नाईक यांनी वाचला आहे. नाईक म्हणाले की, नारायण राणेंनी सत्तेसाठी सुरुवातीला शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. या कालावधीत राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली असल्याची टीका आ.नाईक यांनी केला आहे.

Exit mobile version