राणे यांना तिसर्‍यांदा पराभूत व्हावं लागेल: विनायक राऊत

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तिसर्‍यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणं हे माझं भाग्य समजतो, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलंय. ते चिपळूणमध्ये बोलत होते. चिपळूणमध्ये शुक्रवारी (दि.5) इंडिया आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तसंच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.

या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना विनायक राऊत म्हणाले की, ‘आमच्यासमोर कोणीही येऊ देत, किमान अडीच लाखाच्या फरकानं त्याला आपटणार. तसंच महायुतीचा उमेदवार 12 तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे’, असा टोला राऊत यांनी लगावला. किरण सामंत हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले असते, नारायण राणे हे माझ्यासाठी आव्हान नाही. राणे यांना तिसर्‍यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणं हे माझं भाग्य आहे. नारायण राणे यांना सलग तिसर्‍यांदा पराभूत व्हावं लागेल’, असं भाकीतही यावेळी राऊत यांनी वर्तवलं.

Exit mobile version