रेल्वे विभागाचे संकेत
। नेरळ । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा मध्य रेल्वेकडून बंद ठेवण्यात येते, तर दसर्याला मोठ्या उत्साहात ही सेवा पूर्ववत सुरू होते. यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मिनी ट्रेन सुरू होण्याचा मुहूर्त चुकला असला तरी माथेरानमधील दिवाळीच्या हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी रुळावर येणार असून तिची शीळ पुन्हा एकदा दर्याखोर्यात घुमणार असल्याचे संकेत रेल्वे विभागाकडून मिळाले आहेत.
8 जून 2024 पासून सुरक्षेच्या दृष्टीने नेरळ-माथेरान सेवा रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. दरवर्षी पावसाळ्यात ही सेवा मध्य रेल्वे प्रशासनाकडून बंद केली जाते, मात्र अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू असते. माथेरानची राणीला 100 वर्षे पूर्ण झाली असून आजही पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वर्षाकाठी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असून सर्वांनाच मिनी ट्रेनने सफर करण्याची इच्छा असते. आता पर्यटकांची प्रतीक्षा संपणार असून 1 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सेवा सुरू होणार असल्याचे संकेत मध्य रेल्वे विभागाने दिले आहेत. सध्या नेरळ माथेरान रेल्वे मार्गाची दुरुस्ती अखेरच्या टप्प्यात असून विस्टा डोम डब्यांसह वाफेच्या इंजिनाचा लूक असलेले इंजिन नेरळ लोको शेडमध्ये आणली आहे.
पावसाळ्यात नेरळ-माथेरान सेवा रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात येत असली तरी माथेरान ते अमन लॉज अशा शटल फेर्या सुरू असतात. दरवर्षी दसर्याला मिनी ट्रेन सुरू होणं हा शिरस्ता आहे. यंदा 15 ऑक्टोबर रोजी मिनी ट्रेन सुरू होणार अशी माहिती देण्यात आली होती, मात्र परतीच्या पावसाने हा मुहूर्त हुकला आहे. सुटीच्या हंगामांप्रमाणे दिवाळी सुटीचा हंगाम माथेरानमधील प्रमुख पर्यटन हंगाम समजला जातो. दिवाळीत अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याचा बेत आखतात. त्यात मुंबई-पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावरचे ठिकाण म्हणून माथेरानला पर्यटकांकडून पसंती जाते. मिनी ट्रेनचा प्रवास म्हणजे पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते, त्यामुळे दिवाळीत मिनी ट्रेन सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.