माथेरानची राणी नोव्हेंबरमध्ये येणार रुळावर

। माथेरान । मुकुंद रांजणे ।

सर्वानाच प्रतीक्षा असणारी नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी माथेरानची महाराणी अर्थातच मिनिट्रेन 1 नोव्हेंबरपासून रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रतीक्षा असणारी ही सेवा लवकरच उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात घाटरस्त्यात होणार्‍या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. याच कारणास्तव ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही सेवा नेहमीच पूर्वपदावर येते; परंतु यावेळी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन 1 नोव्हेंबरपासून ही गाडी रुळावर येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत चार महिने घाटातील काही तांत्रिक बाबी तसेच रुळांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात येत असून या महिन्यात अनेकदा मालवाहू ट्रेन नियमितपणे नेरळवरून माथेरान स्थानकापर्यंत ये-जा करत होती. पर्यटक हे खासकरून या गाडीची सफर करण्यासाठीच येतात. काही वर्षांपासून अमन लॉज ते माथेरान स्टेशन दरम्यान मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध असल्याने पावसाळ्यातसुध्दा पर्यटक मोठया संख्येने हजेरी लावतात. नेरळ ते माथेरान मिनिट्रेनच्या मर्यादित आणि कमी फेर्‍या असल्यामुळे अनेकदा पर्यटकांना तिकिटाअभावी या गाडीचा आनंद घेता येत नाही. 21 किलोमीटरचा हा प्रवास करताना डोंगर-दर्‍यांना आव्हाने देत येणार्‍या या गाडीतुन प्रवास करणे म्हणजे पर्यटकांना एक विलक्षण आनंद मिळतो. लहान मुलांना खर्‍या अर्थाने या गाडीची मजा घेता येते. त्यासाठी या मार्गावर फेर्‍या वाढविल्यास पर्यटनात वाढ होऊ शकते, असे पर्यटकांसह स्थानिक बोलत आहेत.

रेल्वे प्रशासनाने नव्या धाटणीची इंजिने उपलब्ध केल्यास गाडीच्या फेर्‍यात वाढ होऊन पर्यटन निश्‍चितपणे बहरेल. त्यासाठी स्थानिकांनी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
Exit mobile version