रायगड काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी वेगवान घडामोडी

प्रविण ठाकूर, महेंद्र घरत यांची नावे आघाडीवर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप व काँग्रेसचे अलिबागचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. जिल्हा काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली असून, कामगार नेते महेंद्र घरत, विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर तसेच कै. जगताप यांच्या कुटुंबातील त्यांच्या सुकन्या व महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप अशी नावे त्यासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी जिल्ह्यात भक्कम जनाधार असलेल्या काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. अलिबाग व पेण विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे वजनदार नेते, कार्यकर्ते काँग्रेसपासून दूर गेल्याने पक्षाची अवस्था अधिकच बिकट झाली. अलिबाग व पेणमध्ये पक्षाची विधानसभा निवडणुकीत झालेली वाताहात एकनिष्ठ कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी ठरत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांच्यासारखा आक्रमक चेहरा आल्याने कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. पटोले यांनी गेल्या दीड महिन्यात दोन वेळा रायगडचा दौरा केल्याने त्यांनाही पक्षामधील अस्वस्थतेचा अंदाज आला आहे. संपूर्ण जिल्ह्यातील जनतेमध्ये आदराचे स्थान असणारा नेता त्या पदावर यावा, अशी अपेक्षा कार्यकर्ते करीत आहेत. अ‍ॅड. प्रवीण ठाकूर हे सक्रिय नेते असून, माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ते जेष्ठ पुत्र आहेत. रायगड जिल्ह्यातील ते प्रसिद्ध वकील असून जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष तसेच लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सैन्य निधीला दरवर्षी लाखो रुपयांची आर्थिक मदत, मुंबई-मांडवा रो-रो सेवा, अलिबागसाठी रेल्वे सेवेसाठी पाठपुरावा, स्थानिकांचा रोजगार अशा विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवीत राहिल्याने तरुण वर्गात ते प्रसिद्ध आहेत. जिल्हास्तरावर सर्व तालुक्यात परिचित असल्याने तसेच तरुण वर्गामध्ये प्रसिद्ध असल्याने अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांचे नाव याआघाडीवर असून ते या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
उरणचे महेंद्र घरत हे कामगार नेते असून, धडाकेबाज स्वभाव अशी त्यांची ओळख आहे. संघटन कौशल्य ही त्यांची भक्कम बाजू मानली जाते. पण उरण हे नवी मुंबईमध्ये येत असल्याने पक्ष दक्षिण रायगडमधील उमेदवार देऊ शकतो अशीही चर्चा सुरू झाली आहे. खोपोलीचे बेबी सॅम्युअल, कर्जतचे पुंडलिक पाटील अशी नावेही पक्षासमोर असू शकतात. मात्र त्यांच्या वयोमानाचा विचार करून ही संधी त्यांना मिळणे संभवत नाही. माजी मुख्यमंत्री ए. आर.अंतुले यांच्यानंतर कै.माणिकराव जगताप व कै. मधुशेठ ठाकूर या दोघांनाही जिल्ह्यात एक प्रसिद्धीचे वलय होते, अंतुलेंच्या पश्‍चात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या दोन्ही दिवंगत नेत्यांना आदराचे स्थान होते. त्यामुळे जगताप किंवा ठाकूर या दोन कुटुंबातील एका व्यक्तीची जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यताच जास्त असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Exit mobile version