दुर्मिळ फळां-फुलांनी वेधले भाविकांचे लक्ष

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलमधील प्राचीन खान्देश्वर मंदिराबाहेरील कॅननबॉल अर्थात नागलिंगम वृक्ष सध्या बहरला आहे. त्यावरील आकर्षक फुले आणि गोलाकार फळांनी भाविकांसह निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिरात दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या दुर्मिळ वृक्षाचे दर्शन घेत असून, त्याच्यासोबत छायाचित्रे काढण्याचा आनंद घेत आहेत.

नागलिंगम वृक्षाचे शास्त्रीय नाव Couroupita guianensis असून, तो मूळचा दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशातील आहे. भारतात हा वृक्ष मुख्यतः मंदिर परिसर, उद्याने आणि वनस्पती उद्यानांमध्ये आढळतो. त्याची सर्वात मोठी वैशिष्ट्‌‍ये म्हणजे त्याची फुले आणि फळे थेट खोडावर येतात. वनस्पतीशास्त्रात या वैशिष्ट्‌याला कॉलिफ्लोरी असे म्हटले जाते.

या वृक्षाची फुले गुलाबी, केशरी आणि पिवळ्या रंगांची असून, त्यातून मोहक सुगंध दरवळतो. फुलाच्या मध्यभागी असलेली रचना शिवलिंग आणि नागफण्यासारखी दिसत असल्याने भारतीय संस्कृतीत या वृक्षाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवमंदिरांच्या परिसरात हा वृक्ष आवर्जून लावला जातो.

कॅननबॉल ट्री हे नाव या वृक्षाच्या फळांवरून पडले आहे. फळे आकाराने मोठी, गोलाकार आणि तपकिरी रंगाची असून, ती जुन्या काळातील तोफेच्या गोळ्यांसारखी दिसतात. प्रत्येक फळाचे वजन काही किलोपर्यंत असू शकते. पिकल्यावर ही फळे जमिनीवर पडतात आणि त्यातील गराला तीव्र वास येतो.
वनस्पती तज्ज्ञांच्या मते, नागलिंगम वृक्ष पर्यावरणीय दृष्ट्‌‍याही महत्त्वाचा आहे. त्याची फुले मधमाश्या आणि विविध परागीभवन करणाऱ्या कीटकांना आकर्षित करतात. तसेच काही पारंपरिक औषधी पद्धतींमध्ये या वृक्षाची पाने, फुले आणि साल यांचा वापर केला जातो. संशोधनामध्ये या वृक्षामध्ये जंतुनाशक आणि दाहशामक गुणधर्म असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. खान्देश्वर मंदिर परिसरातील हा बहरलेला नागलिंगम वृक्ष धार्मिक श्रद्धा, जैवविविधता आणि निसर्गसौंदर्य यांचा सुंदर संगम घडवून आणत आहे. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना हा दुर्मिळ वृक्ष निसर्गाच्या अद्भुत किमयेची अनुभूती देत आहे.

Exit mobile version