रसायनीकर करमणुकीपासून वंचित

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने येथील लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. बाजारपेठेचे मुख्य केंद्र असणार्‍या मोहोपाडा शहरात श्री गणेश मंदिरासमोरील पटांगणत या अगोदर दर्जेदार नाटके होत असल्याने मोहोपाडा शहरातील सांस्कृतिक मेजवानी त्याकाळी जीवंत होती. नामवंत नटांची कला या माध्यमातून रसिकांना पहावयास मिळत होती. आज ती पहावयास मिळत नसल्याने रसायनीकरांत नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या मोहोपाडा शहरात चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच नसल्याने येथील हौशी मंडळीना चित्रपट पाहण्यासाठी पनवेल, वाशी, ठाणे आदी ठिकाणी जावे लागते. त्यामुळे मोहोपाडा रसायनीत थिएटरसह अन्य करमणुकीचे क्षेत्र उभारले जावेत, अशी मागणी रसायनीकर करीत आहेत. मोहोपाडा येथील आशा थिएटर गेली दहा वर्षांपासून बंद आहे. हे थिएटर पूर्वी रसायनी व तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना करमणुकीचे केंद्र बनले होत. येथे ‘माहेरची साडी’ या चित्रपटाला रसिक प्रेक्षक मिळाला. परंतु, आज येथे थिएटरचा अभाव असल्याने रसायनीकरांना उणीव भासत आहे. दरम्यान, रसायनीच्या वाढत्या नागरिकरणात करमणुकीसाठी एखादे सुसज्ज असे क्षेत्र उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Exit mobile version