शेकाप कार्यकर्त्याविरुद्ध राष्ट्रवादीचा रडीचा डाव

दिनेश पाटलांची पोलीस ठाण्यात तक्रार
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरामधील गर्जा रायगड न्यूज चॅनल 24 तास या चॅनलचे संपादक, मालक तथा शेकाप कार्यकर्ते दिनेश पाटील यांच्याविरुद्ध दि. 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेण तालुका महिला अध्यक्षा चैत्राली चंद्रहास पाटील यांनी वडखळ पोलीस ठाण्यात दिनेश पाटील यांची वैयक्तिक बदनामी व्हावी म्हणून चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या काही निवडक पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने तक्रार अर्ज दाखल केला आहे. सदर तक्रार अर्ज हा पूर्णपणे चुकीचा असून, त्यांची वैयक्तिक बदनामी व्हावी या हेतूने हा तक्रार अर्ज आहे. तसेच चैत्राली पाटील यांचा मुलगा साजन चंद्रहास पाटील हा तक्रार अर्जाची छायांकित प्रत पेण तालुक्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियावरील साइटवर टाकून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, त्यामुळे दिनेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांची नाहक बदनामी होत असून, कुटुंबियांना यांच्याकडून मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे, अशा आशयाचे पत्र पेण पोलीस ठाण्यात पेण तालुका लाल ब्रिगेड स्वप्निल म्हात्रे यांच्या उपस्थितीत दिनेश पाटील यांनी दिला आहे. यावेळी शेकापचे अंतोरा सरपंच अमित पाटील व पाटणोली उपसरपंच सूरज पाटील उपस्थित होते. सदरील निवेदनाबरोबर लावलेल्या पुराव्यानुसार दोन्ही पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख नाही, हे प्रथमदर्शी दिसत आहेत. याचाच अर्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रडीचा डाव खेळत आहेत.

Exit mobile version