रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!

कुंभीवलीत निकृष्ट धान्याचा धक्कादायक प्रकार; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळाचा आरोप

|खोपोली | प्रतिनिधी |

गरीबांच्या ताटात जाणाऱ्या रेशनच्या गव्हातच उंदराच्या लेंड्या आणि किडी आढळल्याने खालापूर तालुक्यातील कुंभीवली येथे संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे. धामणी गावातील ग्राहक रोहित संतोष लोते यांनी 28 सप्टेंबर रोजी पुरवठा विभागाकडे निवेदन देऊन संबंधित धान्याची तपासणी करून दुकानदारावर कारवाईची मागणी केली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ वितरित केला जातो. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच धान्यावर अवलंबून असताना कुंभीवली येथील रेशन दुकानातून मिळालेल्या गव्हात किडी आणि उंदराच्या लेंड्या आढळल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रोहित लोते यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, नागरिकांच्या वापरासाठी वितरित होणाऱ्या गव्हामध्ये किडी व उंदराच्या लेंड्या आढळणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. संबंधित गव्हाची तपासणी करून त्याचा दर्जा व सुरक्षितता तपासावी, तसेच रेशन दुकानातील उपलब्ध धान्याची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, खराब किंवा निकृष्ट धान्य ग्राहकांच्या माथी मारले जात असल्यास पुरवठा विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी रेशन कार्डधारकांकडून होत आहे. खराब धान्य देऊन आमच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे का? असा सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुकानदाराला तातडीने नोटीस
ग्राहकाचे निवेदन प्राप्त होताच पुरवठा विभागाने कुंभीवली येथील संबंधित दुकानदाराला नोटीस बजावली आहे. उपलब्ध धान्याबाबत चौकशी करून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

रेशन दुकानात शासनाकडून आलेल्या धान्यामध्ये कचरा, खराब वस्तू किंवा निकृष्ट धान्य आढळल्यास ते ग्राहकांना वितरित करू नये. सदर धान्य गोडाऊनमध्ये जमा करून नवीन धान्य घ्यावे, अशा सूचना सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. कुंभीवली येथील दुकानदाराविरोधात ग्राहकाचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नोटीस बजावण्यात आली असून, नवीन धान्य वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

मनोज पवार,
पुरवठा अधिकारी, खालापूर
Exit mobile version