धक्कादायक! रेशन दुकानदाराकडून होतेय निकृष्ट दर्जाच्या तांदळाची विक्री

ग्रामस्थांची खालापूर तहसील कार्यालयात धाव; कारवाई न केल्यास बहुजन युथ पँथरचा आंदोलनाचा इशारा
। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यात चौक गावातील रेशनिंग दुकानदाराने ग्रामस्थांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू दिल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून या दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी खालापुरच्या तहसीलदारांकडे निवेदन देऊन केली आहे.

या रेशनिंग दुकानदाराचे नाव संजय चौधरी असे असून ग्राहकांना रेशन दिल्यानंतर त्याची रीतसर पावती ग्राहकांना देत नसून त्याने अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ ग्राहकांना दिल्यामुळे चौकमधील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दुकानदाराने दिलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ तहसीलदार आणि कार्यालयातील पुरवठा अधिकार्‍यांना दाखवण्यात आले असून त्या दुकानदाराची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

तसेच या दुकानदारा विरोधात 8 दिवसांत कडक कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन युथ पँथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील जाधव आणि चौक, तूपगाव ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version