। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात रोज 8 शेतकरी आणि देशात रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात. ही या राज्याची, देशाची परिस्थिती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगाजल घेऊन जगभरात फिरत आहेत. आज मॉरिशस, उद्या नेपाळ तर परवा म्यानमारला जातील. इकडे शेतकरी रोज मरतोय आणि हे जगभरात फिरत आहेत, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. शुक्रवारी (दि. 14) सकाळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये युवा पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केली हे अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सराकर हे फक्त बोलत आहे, घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? हे राज्य प्रगतिपथावर आहे असे तुम्ही म्हणता. परंतु, हे राज्य प्रगतिपथावर नसून अधोगतीला लागलेले आहे.
तसेच, एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक आणि जिओ-एअरटेलमधील करारामुळे देशाच्या सुरक्षेला धोका असून सर्वसामान्यांचा डेटा विकला जाईल, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली. जनतेचा, देशाचा डेटा हा विदेशी कंपन्यांच्या हाती लागेल. मोदींनी ट्रम्पसोबत काय सौदा केला माहिती नाही. परंतु, या सौदेबाजीमुळे देशाच्या जनतेच्या अधिकारांवर गडांतर येत आहे, असेही राऊत म्हणाले.
इकडे शेतकरी रोज मरतोय आणि पंतप्रधान मोदी… ; राऊत यांचा टोला
