। मुंबई । वृत्तसंस्था ।
प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक रवि टंडन यांचे शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. अभिनेत्री रविना टंडन यांचे ते वडिल होत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात निर्माता, दिग्दर्शक म्हणून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली होती. टंडन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1960 साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह इन सिमला’ चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. अभिनेता संजीव कुमार आणि अभिनेत्री लीना चंदावरकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘अनहोनी’ हा त्यांचा निर्माता, लेखक, दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘मजबूर’, ऋषी कपूर, नीतू सिंग, राकेश रोशन त्रयीचा ‘खेल खेल में’, ‘जिंदगी’, ‘वक्त की दीवार’, ‘झूठा कहीं का’, ‘खुद्दार’, ‘आन और शान’ आणि ‘नजराना’ यांसारखे काही चित्रपट दिग्दर्शक म्हणून केले होते.