आयसीसी टेस्टमध्ये रविंद्र जाडेजा बेस्ट

रोहित-विराटमध्ये स्पर्धा
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रविंद्र जाडेजा सर्वात भारी ठरलाय. अष्टपैलू क्रिकेटर्सच्या यादीत तो दुसर्‍या स्थानावर आहे. या यादीत वेस्ट इंडीज जेसन होल्डर 412 गुणांसह अव्वलस्थानी आहे. जाडेजाच्या खात्यात 353 गुण आहेत.
या यादीत त्याच्यापाठोपाठ अवघ्या एका गुणाच्या अंतराने आर अश्‍विन तिसर्‍या स्थानावर आहे. एवढचं नव्हे तर रविचंद्रन अश्‍विन गोलंदाजी क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याच्याशिवाय गोलंदाजी क्रमवारीत जसप्रित बुमराह टॉप टेनमध्ये स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरलाय. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात विश्रांतीवर असलेला बुमराह 763 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ज्यो रुट टॉपला आहे. इंग्लंड कर्णधाराने आपल्या खात्यात 903 गुण जमा केले आहेत. त्याच्यापाठोपाठ स्टीव्ह स्मिथ (891), केन विल्यमसन (888) आणि मार्कस लाबुशेन (878) यांचा नंबर लागतो. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने 805 गुणांसह पाचवे स्थान कायम राखले आहे. त्याच्यापाठोपाठ किंग कोहलीचा नंबर लागतो.
रोहित आणि विराट दोघही न्यूझीलंड विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात खेळताना दिसले नव्हते. रोहित शर्मा पुढच्याही कसोटी सामन्यात खेळणार नाही. दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटी सामन्यात संघात कमबॅक करेल. न्यूझीलंड विरुद्ध मोठी खेळी करुन आपले स्थान भक्कम करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. किमान त्याला रोहित शर्माला ओव्हरटेक करणंही सहज शक्य होईल.

Exit mobile version