शेतकर्‍यांना आरसीएफ बळ देईल- अनिरुद्ध खाडीलकर

कृषी प्रदर्शनाची उत्साहात सांगता

| चौल | सुरेश खडपे |

शेतकरी हा देशाचे वैभव असून, त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेती व्यवसायातील अनिश्‍चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणार्‍या बळीराजाला ताकद देण्याचे काम आरसीएफ कंपनीकडून करण्यात येईल, अशी ग्वाही राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. थळ (आरसीएफ) कार्यक्रारी संचालक अनिरुद्ध खाडीलकर यांनी केले. उद्योगाप्रमाने शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. शेतकर्‍यांची प्रयोगशीलता जपली पाहिजे. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी पाठीशी उभे राहण्याचे काम आरसीएफच्या माध्यमातून करण्यात येईल, असेही श्री. खाडीलकर यांनी आश्‍वासन दिले.

कृषक कल्याणकारी संस्था, चौल आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने चौल येथील मुख्य मुखरी गणपतीच्या पटांगणात (दि.4) आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कृषी प्रदर्शन, कृषी मेळावा आणि चर्चासत्र कार्यक्रमाचे उद्घाटन अनिरुद्ध खाडीलकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून आरसीएफ कार्यकारी संचालक सुनील ढोकल, आरसीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासक) भालचंद्र देशपांडे, कर्जत कृषी संशोधन केंद्राचे डॉ. नामदेव म्हसकर, पनवेल खारभूमी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, आंबा उत्पादक संस्थेचे चंद्रकांत मोकल, आरसीएफचे हेमंत गुरसाळे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाश करण्यात आले. तसेच डॉ. नामेदव म्हसकर व रवींद्र पाटील लिखित बागेतील आंतरपिके एक अनुभव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कृषी प्रदर्शनास शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनातील फळपिकांमध्ये सीताराम पाटील यांच्या रात्या केळ्यांच्या घडास प्रथम, शैलेश म्हात्रे यांच्या कलिंगडास (11 किलो) द्वितीय, वसंत घरत यांच्या नारळास तृतीय क्रमांक देण्यात आला. तर, उत्तेजनार्थ अनंत घरत (सुपारी), मनोहर घरत (केळीचा घड) गौरविण्यात आले.

फुलांमध्ये प्रथम ओदश नाईक (बिजली), द्वितीय निशा पाटील (झेंडू), तृतीय क्रमांक विजय टेकाळकर (दवना) यांनी पटकाविला. भाजीपाल्यात प्रथम आदेश नाईक (मिरची), द्वितीय विक्रांत कडवे (मिरची), तृतीय क्रमांक जीवन लोहार (सुरण) यांनी पटकाविला. तर भालचंद्र नाईक (चायनीय कोबी), प्रभाकर नाईक (पांढरा कांदा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

मसाला प्रथम क्रमांक नंदकुमार वाळंज (हळद), द्वितीय जीवन लोहार (हळद), तृतीय क्रमांक सुधाकर राऊळ (हळद) यांनी पटकाविला. तर, उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धराज पाटील यांनी पटकाविले. महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत चौलमळा येथील मनीषा लोहार यांनी नारळाच्या दुधापासून बनविलेल्या खरवसाला प्रथम, तर कृपा मेहता (अलिबाग) यांच्या सुरळीच्या वड्यांना द्वितीय आणि विनिता शिवलकर (चौलमळा) फणसापासून बनविलेल्या फणसाच्या कटलेटना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. तर, रश्मी वाळंज (खजूर मोदक), माधुरी नाईक (कलिंगड काप), कविता राऊत (तांदूळ भाकरी) यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, सर्पमित्र राकेश काठे यांनी सापांविषयी समज-गैरसमज यावर मार्गदर्शन केले. वनअधिकारी श्री. तायडे यांनी वृक्षारोपण व संवर्धन याविषयी माहिती दिली. हकीम शेख त्यांच्या टीमने वानर या विषयावर मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय प्रदर्शनाला चौलसह पंचक्राशितील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रमिता पाटील यांनी, तर आभार मनिषा लोहार यांनी मानले. कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांनी घेतली.


श्रावणीच्या पद्ज्ञासाने कार्यक्रमाला रंगत
प्रदर्शनाचा प्रारंभ गणेशवंदनेने करण्यात आला. यावेळी भरत नाट्य नृत्यप्रकारात मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकाविलेली मूळची अलिबाग येथील रहिवासी; परंतु, आजोळ चौल येथील चौलमळा गावचे असणारी आणि सध्या पनवेल येथील सीकेटी विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी श्रावणी अमर थळे हिने कृषी प्रदर्शनाला आपल्या नृत्याविष्कारातून चार चांद लावत उपस्थितांची वाहवा मिळविली. श्रावणीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पारितोषिके पटकाविली आहेत.

Exit mobile version