नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण

मे 2023 मध्ये केलेले डांबरीकरण लगेच उखडल्याने

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर पोशीर गावापासून पोही फाटा या भागात मे 2023 मध्ये डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, नित्कृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे रस्त्यावरील डांबराचा थर पहिल्याच पावसाळ्यात निघून गेला होता. दरम्यान, या रस्त्याच्या कामाबद्दल कळंब आणि पोशीर परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने डांबरीकरण केले असून स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेने रस्ता नव्याने तयार झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

माथेरान-नेरळ-कळंब हा राज्यमार्ग रस्ता पोहीगावाजवळ कर्जत मुरबाड शहापूर राष्ट्रीय महामार्गाला जाऊन मिळतो. या रस्त्यावर गेली दोन वर्षे अनेक कामे सुरु असून नेरळ भागात या रस्त्यावर एक किलोमीटर अंतराचा रस्ता काँक्रीटचा बनला आहे, तर पुढे धामोते पुलापासून कोदीवले आणि नेरळ पोशीरपासून पोहीफाटा असा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. मे आणि जून महिन्यात पावसाने हजेरी लावली असताना या रस्त्यावर डांबरीकरण सुरु होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर उखडणार होतेच. मात्र, पोशीरपासून पोहीफाटा भागातील डांबरी रस्त्यावरील डांबर जून अखेरीस निघून गेल्याने स्थानिक वाहनचालक आणि कळंब, पोशीर भागातील नागरिकांनी जोरदार टीका केली होती. या विरोधात स्थानिकांनी आंदोलन देखील केले होत. शेवटी पावसाळ्यातील चार महिने स्थानिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला होता. तर नेरळ भागातील रस्ता देखील अल्पवधीत खराब झाला होता. राज्याचे मुख्यमंत्री 23 मे रोजी सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रावर येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, नेरळ कळंब मार्गावर पोशीर भागातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. त्या रस्त्यावर असंख्य तक्रारी आल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नव्याने डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता नव्याने बनला आहे. आता याच रस्त्यावरील सर्वात खड्डेमय समजल्या जाणाऱ्या पोशीर गाव ते वरई या भागातील रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी बीबीएम डांबरीकरण करण्यात आले आहे. महिना अखेर त्या भागातील रस्ता देखील नव्याने डांबरीकरण केला जाणार आहे.

Exit mobile version