रातवड विद्यालयात बालसाहित्य वाचन

। माणगाव । वार्ताहर ।

वाचन संस्कृती रुजावी व विद्यार्थ्यांना वाचनाची व श्रवणभक्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविणार्‍या तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात श्रावण मासानिमित्ताने बालसाहित्याचे वाचन आयोजित केले आहे.

श्रावण महिना हा श्रवण भक्तीचा मानला जातो. श्रावणामध्ये ग्रंथ वाचनाची परंपरा आहे. अलीकडच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे बोलले जाते. विद्यार्थ्यांचे वाचन व श्रवण कमी होत असल्याच्या तक्रारी येत असतात. साने गुरुजींच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, बाळांचे साहित्य या विषयाचे वाचन परिपाठात केले जाते. विद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बाल साहित्यवाचन उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित राहून वाचन व श्रवण भक्तीचा आनंद घेतात.

विद्यार्थ्यांच्या सहभागातून दैनंदिन प्रसाद व्यवस्था करण्यात आली असून श्रवणभक्तीचा हा आनंद दैनंदिन परिपाठांतर्गत घेतला जातो. संपूर्ण श्रावण महिन्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी या उपक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी संस्कृतिक विभाग प्रमुख अजित शेडगे व इतर सर्व शिक्षकांनी नियोजन केले आहे.

Exit mobile version