| पनवेल | प्रतिनिधी |
जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे बुधवारी (दि.15) जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी वडघर केंद्र शाळेतील 150 विद्यार्थी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, जाणीवचे सदस्य आणि रोटरीचे सदस्य यांच्या उपस्थित होते.
यावेळी जाणीवचे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाबाबत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगितली. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध विषयांवरील 35 पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अग्निपंख या दिवंगत भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकातील काही परिच्छेदांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केले.
जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने रो. डॉ. विजयकुमार कुलकर्णी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात स्वच्छ कसे आणि का धुवावेत, याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्यासाठी शाळेला हॅण्ड वॉश लिक्वीड देण्यात आले. त्यानंतर दंत/मौखिक आरोग्याविषयी डॉ. ऋतुपर्ण ससाणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइजचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





