। अलिबाग । प्रतिनिधी ।
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामध्ये मोबाईलचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे पुस्तक व इतर ग्रंथ, वृत्तपत्र वाचनाकडील कल कमी होण्याची भिती निर्माण झाली आहे. शासनाने वाचन संकल्प उपक्रम राबवून वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनामुळे चिंतन करण्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढीला चालना मिळते. त्यामुळे वाचन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रंथालयाच्या कार्यवाह शैला पाटील यांनी केले आहे.
वाचन संकल्प महाराष्ट्र पंधरवडा उपक्रमांतर्गत प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प उपक्रम बुधवारी (दि.8) अलिबागमधील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात राबविण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, कोकण साहित्य मराठी परिषद अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदू थळकर, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आर.के. घरत, जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, हेमकांत सोनार, अलिबाग नगरपरिषद शाळा शिक्षिका प्रमिला म्हात्रे, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, कर्मचारी झेबा कुरेशी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, कोमसापअलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदू थळकर आदींनी मार्गदर्शन केले. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
विद्यार्थ्यांचा सन्मान
वाचन संकल्प महाराष्ट्र पंधरवडा जिल्ह्यात सुरु आहे. अलिबाग नगरपरिषद शाळा क्रमांक तीनमधील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने बुधवारी प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वाचनालयाची माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचनालयातील गोष्टींची व इतर विषयांतील पुस्तकांचे वाचन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्यवाह शैला पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.