सेझसारखा लढा पुन्हा उभारु – माजी आ. धैर्यशील पाटील

। अलिबाग । वार्ताहर ।
वडखळ परिसरात उभारण्यात येणार्‍या एमआयडीसीला येथील शेतकर्‍यांचा ठाम विरोध असून, जर अकरा गावातील जमिनी बळजबरीने संपादित केल्या गेल्या तर सेझसारखा लढा पुन्हा उभा करु,असा सज्जड इशारा माजी आ.धैर्यशील पाटील यांनी यावेळी दिला.

मेळाव्यात त्यांनी अभ्यासपूर्ण आणि जोशपूर्ण भाषण करुन सर्वांची मने जिंकली.वडखळ येथे शेकापचा मेळावा घेण्यामागची पार्श्‍वभूमीही त्यानी सांगितली. वास्तविक हा मेळावा पेणमध्ये घ्यावा, अशी माझी इच्छा होती. पण आ.जयंत पाटील यांनी अधिकारवाणीने धैर्यशील आपल्याला लालबावट्याची चळवळ वाढवायची असेल तर मेळावा हा वडखळलाच होणार असे निक्षूण सांगितले. येथील अकरा गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी जेएसडब्ल्यू घशात घालणार असेल तर त्यांच्या घशातून या जमिनी काढून घ्याव्याच लागतील त्यांना धडा शिकविण्यासाठी शेकापने हा मेळावा घेतला असल्याचे जयंत पाटील यांनी आपल्याला सांगितले, असे त्यांनी सुचित केले.

देशाच्या विकासासाठी अशा गोंडस नावाखाली हेलिकॉप्टरमधून फिरणार्‍या उद्योगपतींना आमच्याच जमिनी दिसल्या का,असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला त्या जमिनी आवडल्या खर्‍या त्या जमिनी आमच्या आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. यासाठी पुन्हा एल्गार करण्याची आमची तयारी आहे. आता झोंबी करायच्या त्या कुत्र्या, मांजरांसोबत नव्हे तर वाघासोबतच करायच्या आहेत. मग तो भांडवलदार असू दे अथ़वा त्या भांडवलदारांना साथ देणारे राज्यकर्ते असोत त्यांच्या विरोधात लढण्याची ताकद येथील जनतेमध्ये आहे,असा सज्जड इशाराही पाटील यांनी दिला.

जे सामाजिक प्रश्‍न आहेत त्यांना राजकीय प्रश्‍नांचे स्वरुप दिले तर ते तातडीने सुटू शकतात असेही त्यांनी सुचित केले.दहा वर्षापूर्वी याच भूमीत कर लो दुनिया मुठ्ठी मे असे म्हणणार्‍या रिलायन्सच्या अंबानींनी पेणच्या शेतकर्‍यांनाही मुठीत घेण्याचा प्रयत्न केला. पण येथील शेतकर्‍यानी एकजूट दाखवून बड्या अंबानीलाही येथून पळवून लावले. तशी वेळ पुन्हा आली आहे.असे त्यांनी निक्षून सांगितले.

काँग्रेस विरोध हा युएसपी
महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेसचे प्राबल्य असताना रायगडसह कोकणाने मात्र काँग्रेस विरोधी विचाराची कास धरली त्यामुळे कोकणात डावी चळवळ टिकून राहिली. भविष्यातही तसा विचार पुन्हा करण्याची वेळ आली आहे,अशी रोखठोक भूमिका त्यानी मांडली. काँग्रेस विरोध हा शेकापचा युएसपी असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.

पक्षाचा इतिहास सांगतानाच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शेकापने दिलेल्या योगदानाचाही उहापोह केला. महाराष्ट्रात कोकण वगळता अन्यत्र काँग्रेसचे प्राबल्य होते.पण कोकणच्या भूमीने मात्र नेहमीच काँग्रेस विरोधी विचार केला आणि त्यामुळेच कोकणच्या लालभूमीत डावी चळवळ टिकून राहिली.रायगडात शेकाप आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनता पक्षाने आपली ताकद काँग्रेसला दाखवून दिली. प्रस्थापितांच्या विरोधात लढण्याची ताकद कोकणच्या भूमीत असल्याने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील स्वराज्याची राजधानी निवडताना किल्ले रायगडचीच निवड केली हे उदाहरण देखील धैर्यशील पाटील यांनी आपल्या भाषणातून दिले. आतापर्यंत झालेल्या निवडणुकींचा उल्लेख करताना त्यांनी येथील जनतेेने कधी काँग्रेस, कधी शेकाप यांनाच निवडूण दिले.

राजापूर लोकसभा मतदार संघातून सुद्धा काँग्रेसचे खासदार अवघे दोनवेळाच निवडूण आल्याचेही त्यांनी सांगितले. सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ काँग्रेसविरोधी विचारांचा प्रसार केल्यामुळे मी विजयी झालो.या विजयात पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. शिवाय आम.जयंत पाटील,प्रा.एन.डी.पाटील,विवेक पाटील, गणपतराव देशमुख आदी ज्येष्ठांनीही सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन केल्याचेही असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

भूतकाळाचा अभ्यास केल्याशिवाय भविष्याचा वेध घेता येत नाही, यासाठी शेकापने पुन्हा काँग्रेस विरोध वाढविला पाहिजे का, याचा विचार यानिमित्ताने करावा, अशी विनंतही त्यांनी मान्यवरांना केली.

Exit mobile version