झाडांच्या सावलीची किंमत ओळखा!

| पनवेल | प्रतिनिधी |

उन्हाळा सुरू होताच अंगाची लाही लाही होत असताना नागरिकांना झाडांच्या थंडगार सावलीची आठवण प्रकर्षाने होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांच्या सावलीत क्षणभर विसावा घेताना मिळणारा सुखद अनुभव हा प्रत्येकासाठी दिलासा देणारा ठरतो.

सिडको प्रशासनाने वसाहती उभारताना रस्त्यांच्या बाजूने आणि फूटपाथवर वृक्षलागवडीची मोहीम राबवली होती. त्याचा सकारात्मक परिणाम आजही अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जुनी झाडे नागरिकांना दिलासा देत असून, पर्यावरण संतुलन राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, सध्याच्या घडीला पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्या बांधकामांदरम्यान वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून आवश्यक त्या प्रमाणात झाडे लावली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात, फोटो आणि सेल्फी काढले जातात; मात्र त्यानंतर त्या रोपांची देखभाल होत नसल्याने अनेक झाडे नष्ट होतात. परिणामी, भविष्यात हरित क्षेत्र कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, वृक्षलागवड केवळ दिखावा न राहता त्याचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाने यासाठी ठोस धोरण आखून बांधकाम व्यावसायिकांना सक्तीने वृक्षलागवड व देखभालीचे आदेश देणे गरजेचे आहे. एकूणच, झाडांची सावली हीच खरी उन्हाळ्यातील दिलासा देणारी गोष्ट असल्याने आजच योग्य पावले उचलली नाहीत तर भविष्यात गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागू शकतो.

Exit mobile version