पोलादपूरातील बहुचर्चित पुलांची पुनर्बांधणी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

2009 ची लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या वादग्रस्त कापडे-कामथे-बोरघर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या श्रेयवादाची आणि भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होती. 2021च्या अतिवृष्टी, महापूर आणि भुस्खलनावेळी या पुलांच्या ऍप्रोच रोडला मोठया प्रमाणात माती व झाडोर्‍याच्या प्रवाहाचे दणके बसून ऍप्रोच रोड वाहून गेल्याने हे पुल कमकुवत झाल्याची चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी मंजूर झालेले दोन नवीन पुल प्रवाहाचे दणके बसू शकतील, त्याच बाजूला बांधण्यात येत असल्याने दोन्ही पुलांनादेखील तशाच प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित कापडे-कामथे-बोरघर या पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 2008 रोजी तत्कालीन खासदारांच्या हस्ते झाल्यानंतर या कामाच्या विविध त्रूटी व चुका तसेच भ्रष्टाचाराच्या चर्चा होऊन अनेकदा या कामात बदल झाला. सरतेशेवटी कापडे-कामथे-बोरघर अशी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा विस्तार होऊन काही ठिकाणी नव्याने पुलांची बांधणी झाली. या योजनेचे राज्याचे तत्कालीन मुख्य अभियंता सी.डी.फकीर यांनी पुणे येथील राज्याच्या विशेष गुणवत्ता नियंत्रकांमार्फत रस्त्याच्या दर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जारी केल्या. या आदेशाचे पत्र राज्याचे मुख्य अभियंता कार्यालयातून जारी झाले. यामुळे या रस्त्याचे ठेकेदार आर.के.चंदानी आणि अभियंता आंबटकर यांचे धाबे दणाणले.

कापडे ते कामथे या योजनेतील रस्ता जागोजागी उखडल्याबाबत वृत्तपत्रांनी थेट या रस्त्यासाठी पाठपुरावा करणारे माहितीचा अधिकाराचे कार्यकर्ते रमेश मालुसरे यांचे आरोप प्रसिध्दीस दिले. यानंतर योजनेच्या एक्झीक्युटीव्ह इंजिनियर रिताली बारमदे यांनी वेळोवेळी ठेकेदार आर.के.चंदानी कन्स्ट्रक्शन्स कंपनी उल्हासनगर यांना नोटीसा बजावल्या. मात्र, राजकीय हितसंबंध जोपासून पोलादपूर तालुक्यात निकृष्ट कामे करणार्‍या या ठेकेदार कंपनीने या नोटीसांना भीक घातली नव्हती. शेवटी ठेकेदाराच्या अनामत रक्कमेतून निविदा काढून अन्य ठेकेदारांकडून हे काम पूर्ण करण्याचा इशारा दिला. मात्र, तोपर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कापडे ते कामथे रस्त्याची एकूण 18.600 कि.मी. लांबी असून खास दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत 64.30 लाख रूपयांचा निधी उपलब्ध होऊन या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीचे कामास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर राजकीय गुलदस्त्यातच चौकशी दडल्याने पुढे काहीही निष्पन्न झाले नाही.

2021 मध्ये अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनामुळे या रस्त्यावरील दोन पुलांना जोरदार हादरे बसून पुल कमकुवत झाल्याची चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात या पुलांच्या दुतर्फा ऍप्रोच रोडच्या कॉलर्स भुस्खलनात वाहून आलेल्या राडा रोडयामुळे तडकल्याने या पुलांना आंबेनळी घाटाकडे जाणार्‍या महाबळेश्‍वर रस्त्यावरील पुल आणि मोर्‍यांप्रमाणे काँक्रीट जॅकेट करून मजबुतीकरणाची गरज असताना या पुलांवर ज्याबाजूने भुस्खलनाचा आणि महापुराचा मारा झाला त्याच बाजूला नवीन पुलांचे बांधकाम करण्यासाठी कापडे पितळवाडी बोरघर कामथे रस्ता प्रजिमा 101 च्या 5-100 वरील मोठया पुलाचे बांधकाम करणे आणि प्रजिमा 101 च्या 5-500 वरील मोठया पुलाचे बांधकाम करणे या कामांचा भुमिपूजन सोहळा सावित्री नदी बोरज फाटा येथे करण्यात आला.

Exit mobile version