ठप्प झालेली वाहतूक आपत्ती निवारण यंत्रणेकडून पूर्वपदावर
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील कापडे कामथे रस्त्यावरील बोरज हद्दीत व गोपाळवाडीजवळ रस्त्यावर झाड कोसळले. आपत्ती निवारण यंत्रणेकडून तात्काळ जेसीबी पाठवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
पोलादपूर तालुक्यात गेली आठ दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने थोडीफार उसंत दिली आहे. तरी, सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या धुवाधार पावसात कापडे ते कामथे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आपत्ती निवारण कक्षामार्फत जेसीबी पाठवून तात्काळ वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील साखर ते खडकवाडी रस्त्यावर गुडघाभर चिखल झाला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. आपत्ती निवारणासह संबंधित यंत्रणेकडून ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.