उरणकरांची केंद्र, राज्य सरकारकडे मागणी
| उरण | प्रतिनिधी |
उरण हा तालुका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे या तालुक्याला सातत्याने नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा सहन करावा लागत आहे. अशा वादळात विद्युत वाहक तारा तुटून लोखंडी खांब (पोल) पडण्याच्या घटनाही घडत असल्याने दोन ते तीन दिवस विद्युतपुरवठा खंडित होऊन रहिवाशांना अंधारात चाचपडत जीवन जगावे लागत आहे. तरी, या संकटावर मात करण्यासाठी व विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात भूमीगत केबल टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तमाम उरणकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्याच औद्योगिक झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यातील रहिवाशांना व प्रकल्पांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जात आहे. मात्र, या तालुक्याला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा सहन करावा लागत आहे. अशा वादळात रहिवाशांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात अतिवृष्टीमुळे, वादळामुळे विद्युत वाहक तारा तुटून लोखंडी खांब (पोल) पडण्याच्या घटनाही घडत असल्याने दोन ते तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होऊन रहिवाशांना अंधारात चाचपडत जीवन जगावे लागत आहे. नुकताच उरण तालुक्याला अतिवृष्टीबरोबर चक्रीवादळाचा तडाखा बसला. या नैसर्गिक संकटात अनेक गावांतील रहिवाशांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन, विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून लोखंडी खांब पडल्याने दोन ते तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तरी, या संकटावर मात करण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात भूमीगत केबल टाकण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रहिवासी व्यक्त करत आहेत.
उरण तालुक्यात नुकताच ओढवलेल्या नैसर्गिक संकटात महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र भरपावसात विद्युत वाहक तारा जोडण्याचे व लोखंडी खांब उभे करण्याचे काम करत आहेत. तरी नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी व विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या तालुक्यात भूमीगत केबल टाकणे आवश्यक असून, तशा प्रकारची मागणी महावितरण विभागाची आहे.
जयदीप नानोटे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण उरण
अतिवृष्टी आणि वादळामुळे विद्युत वाहक तारा तुटून लोखंडी खांब पडण्याच्या घटना घडत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तरी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने भूमीगत केबल संपूर्ण तालुक्यात टाकण्यासाठी महावितरण कंपनीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या नैसर्गिक संकटात विद्युतपुरवठा सुरळीत राहील.
ॲड. सत्यवान भगत,
तालुकाध्यक्ष,
मनसे उरण