डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशनची सिडकोकडे मागणी
| चिरनेर | वार्ताहर |
सिडको महामंडळात प्रकल्पग्रस्तांचीच शंभर टक्के नोकर भरती करा, अशी मागणी डेमॉक्रॅटिक युथ फेडरेशन (डीवायएफआय) या युवक संघटनेने केली आहे. तसे न केल्यास स्थानिक भूमिपुत्र तरूण सिडकोविरोधात आंदोलन करतील, असा इशारा या संघटनेने दिला आहे. या संदर्भात सिडकोला मागणीचे पत्र देण्यात आले आहे.
सिडकोमध्ये इंजिनिअर, क्लार्क त्याचप्रमाणे इतर पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यासाठीची सिडकोच्या विविध विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे सिडकोमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून मागील दाराने नोकर भरती केली जात आहे. ती बंद करून सिडको महामंडळातील रिक्त या पदांची नोकर भरती सुरू करून या पदांवर नवी मुंबई प्रकल्पासाठी ज्या ठाणे (बेलापूर), पनवेल व उरणच्या 95 गावांतील स्थानिक भूमिपुत्रांमधूनच झाली पाहिजे. अशा प्रकारची नोकरभरती यापूर्वी सिडकोने केलेली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सिडकोबाधित प्रकल्पग्रस्त आणि इतर प्रकल्पग्रस्त यांना एकसमान न ठरवता यांच्यातील फरक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी डीवायएफआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे यांनी केली आहे. तसे न केल्यास सिडको विरोधात भूमिपुत्र तरुण तीव्र आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.