लाल माती तस्करांना दणका

तीन हायवा ट्रक, दोन जेसीबी जप्त; पाच जणांविरोधात गुन्हा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वनजमिनीत सुरू असलेल्या लाल माती उत्खननावर वन विभागाने मोठी कारवाई करत तीन हायवा ट्रक आणि दोन जेसीबी मशीन जप्त केली आहेत. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, माती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यातील लाल मातीला मुंबई परिसरातील गार्डन व विविध विकासकामांसाठी मोठी मागणी आहे. महसूल विभागाने मागील वर्षी बेकायदा उत्खननाविरोधात कठोर कारवाई केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील माती देण्यास नकार दिला. त्यामुळे माती तस्करांनी वनजमिनींकडे मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे.

सुगवे परिमंडळातील वारे गावाजवळील चिंचवाडी परिसरात वनजमिनीतून मोठ्या प्रमाणावर लाल माती उपसली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर कर्जत पश्चिमचे वनक्षेत्रपाल समीर भुजबळ यांनी माहितीची पडताळणी करून जिल्हा उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना अहवाल दिला. वरिष्ठांच्या आदेशानुसार शनिवारी मध्यरात्री वन विभागाच्या पथकाने चिंचवाडी येथे धाड टाकली. कारवाईदरम्यान वनजमिनीत उत्खननासाठी वापरली जाणारी दोन जेसीबी मशीन आणि तीन हायवा ट्रक रंगेहाथ पकडण्यात आले. संबंधित वाहनांवर तात्काळ जप्तीची कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सोमवारी (दि. 22) त्यांना अलिबाग येथील वन न्यायालयात हजर करण्यात आले. जप्त करण्यात आलेली दोन्ही जेसीबी आणि तीनही ट्रक सध्या वन विभागाच्या ताब्यात असून, पोही डेपो येथे ठेवण्यात आले आहेत. वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही व्यवस्थाही करण्यात आली आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील लाल माती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Exit mobile version