। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी होणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. रिफायनरीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात स्थानिक लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीला आ. राजन साळवी उपस्थित होते. तर, खासदार विनायक राऊत यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे ठाकरे गटात रिफायनरीच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या रिफायनरीवरुन सुरुवातीस भाजप आणि शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु, सत्तांतराच्या नाट्यानंतर सत्ताधारी आणि शिवसेना उद्धव गट यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असताना आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या रिफायनरीला स्थानिक आमदार राजन साळवींचं समर्थन असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, राजन साळवी आणि आमच्या सर्व अधिकार्यांची बैठक ठेवण्यात आली होती. याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करीत आहेत आणि जे समर्थन करत आहेत, या सर्वांच्या शंका दूर करायच्या आहेत. पण, आधी याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र दिलं होतं, त्यावर सांगोपांग चर्चा झाल्याचेही सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पालासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं. तसेच यातून विविध टप्प्यांवर 5 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आ. साळवींची मागणी मान्य
तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत एक पत्र दिलं होतं. त्यानुसार, 13 हजार एकर जागेचं संपादन बारसूमध्ये होऊ शकतं. पण यामध्ये सोलगाव, देवाचं गोठले, शिवणे या गावांनी याला विरोध केला होता. साळवी यांची मागणी होती की, ही तीनही गावं या प्रकल्पात येणार नाही, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
लाखो तरुणांना रोजगार
या प्रकल्पासाठी एकूण 6,200 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 2900 एकर जागेसाठी तिथल्या जमीन मालकांनी संपत्तीपत्रं दिलेली आहेत. या प्रकल्पाचा आवाका दोन लाख कोटींचा आहे. यामध्ये बांधकाम फेजमध्ये सुमारे एक लाख लोकांना रोजगार, ऑपरेशन फेजमध्ये तीन लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार 75 हजार लोकांना मिळणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.
कोयनाचे पाणी
कोयना धरणातून पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार. ज्या शहरातून गावातून ही पाईपलाईन जाईल, त्यांनादेखील पाण्याचा टॅब दिला जाणार आहे. पण, पाणीपट्टी मात्र संबंधित गावांनी भरायची आहे.