जेफ बेझॉस हा एक भयानक श्रीमंत माणूस आहे. मध्यंतरी तो आणि इलॉन मस्क यांच्यात जगातला सर्वात श्रीमंत होण्यासाठी स्पर्धा होती. आता ती नाही. बेझॉस खाली आला. आता आपले गौतम अदानी त्यात घुसले आहेत. सध्या ते नंबर तीनवर आहेत. बेझॉसची संपत्ती सुमारे बारा हजार कोटी डॉलर्स इतकी आहे. रुपयांमध्ये ती सुमारे 19 लाख साठ हजार कोटी होते. भारताच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील करांमधून मिळणारी एकूण अपेक्षित जमा आहे 19 लाख 34 हजार कोटी रुपये. म्हणजे आख्ख्या भारताच्या करसंकलनापेक्षाही बेझॉसची संपत्ती थोडीशी जास्त आहे. अशा या बेझॉसने जगात मंदी येत असल्याचा इशारा दिला आहे. घरात असो की धंदा-व्यवसायात सध्या कोणतीही मोठी खरेदी किंवा कोणतेही मोठे व्यवहार करू नका असे त्याने सांगितले आहे. बेझॉसने त्याचे स्वतःचे किती खर्च कमी केले हे ठाऊक नाही. पण आपल्या धंद्यामध्ये मात्र त्याने खर्च-कपात सुरू केली आहे. अर्थात, बेझॉस किंवा कोणाही अब्जोपती मालकाला कायमच कर्मचार्यांवरचा खर्च हा मोठं ओझं वाटत असतं. काहीतरी जादू होऊन कर्मचार्यांना फुकटात राबवून घेता आले असते तर हे मालक सर्वाधिक खूष झाले असते. त्यामुळे खर्च कपातीचा मुद्दा निघाल्यावर सर्वात पहिली कुर्हाड पडते ती कर्मचार्यांच्या नोकर्यांवर. बेझॉसची कंपनी आहे अमेझॉन. ऑनलाईन वस्तू विक्री अर्थात इ-कॉमर्समधील ती बलाढ्य कंपनी आहे. याखेरीज इंटरनेटशी निगडित असंख्य व्यवसायात ती आहे. जगभरात तिचे सुमारे पंधरा लाख कर्मचारी आहेत. यातले बरेचसे हंगामी आणि कंत्राटावर काम करणारे आहेत. त्यातही घरोघर वस्तू पोचवणार्या टपाली नोकरांची संख्या अधिक आहे. अमेझॉनने आता त्यांच्यात मोठी कपात करायला सुरुवात केली आहे. आरंभ अमेरिकेपासून झाली आहे. पण लवकरच भारतासह सगळीकडे हे लोण येणार आहे. सुरुवातीला किसान दहा हजार लोकांच्या नोकर्या जाणार आहे. कोरोनाच्या काळात कंपनीची विक्रमी विक्री व नफा झाला. लोक घरीच वस्तू मागवत असल्याचा तो परिणाम होता. कोरोना संपल्यावर ही विक्री खाली आली. पण याचा अर्थ कंपनीचे दिवस एकदमच फिरले असे झालेले नाही. सप्टेंबर महिन्याअखेरच्या तिमाही निकालांनुसार अमेझॉनची एकूण विक्री 12 हजार 700 कोटी डॉलर इतकी होती. गेल्या वर्षीपेक्षा ती अधिकच आहे. तिचा या तीन महिन्यांचा नफा पाच हजार 600 कोटी डॉलर आहे. भारतीय मूल्यामध्ये हे मूल्य सुमारे साडेचार लाख कोटी रुपये होते. पण तरीही अमेझॉन आणि बेझॉस हे कर्मचार्यांना दयामाया दाखवायला तयार नाहीत. या कत्तलीमध्ये तळाकडचे लोक अधिक भरडले जाणार हे उघड आहे. अशा कर्मचार्यांचे तासाचे वेतन सुमारे नव्वद रुपये आहे. म्हणजे दिवसाचे सुमारे सातशे रुपये. महिन्याचे तीसही दिवस काम केले तर 21 हजार रुपये. त्याच्या वरच्या श्रेणीतल्या बाबूंचा सरासरी पगार वर्षाला सुमारे पाच लाख रुपये आहे. पण एका तिमाहीमध्ये साडेचार लाख या हिशेबाने वर्षाला सुमारे अठरा लाख कोटी रुपये नफा कमावणार्या अमेझॉनला हे काही हजार रुपयांचे पगार भारी वाटू लागले आहेत. काही महिने वाट पाहण्याची तिची तयारी नाही. एक काळ असा होता की, आज तोटा झाला म्हणून उद्या कामगार कपात केली असे करणे शक्य नव्हते. अगदी अमेरिकेतही नव्हते. पण आज वातावरण मालकाला धार्जिणे आहे. कायदे मालकाच्या बाजूचे आहेत. तो कोणत्याही क्षणी कामगाराला घरी पाठवू शकतो. त्याच्यावर दबाव टाकू शकण्यासाठी तिथे कामगार संघटनाच अस्तित्वात नाहीत. धाक वाटेल अशी सरकारे नाहीत. कारण, कंपन्या सरकारांहूनही मोठ्या आहेत. मालक आणि त्यांच्या कंपन्या यांच्या उत्पन्नात काही हजारांची तूट आली तर लगेच लाखो कर्मचार्यांच्या नोकर्यांवर गदा आणणारी ही व्यवस्था आहे. असे करणारी अमेझॉन एकटीच नाही. फेसबुकने अकरा हजार तर ट्विटरने पन्नास टक्के कर्मचारी काढले आहेत. अमेरिकी आणि भारतीय सुद्धा भांडवलशाहीचा हा खरा चेहरा आहे. सर्वांनी तो नीट पाहून ठेवावा.