आरोपीला तीन तासांत अटक
| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील सोंडेवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तेजस राम सांबरी याला खालापूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अटक केली. पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर तसेच आरोपीने लग्नास नकार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेत असून, ती आपल्या आई-वडिलांसमवेत सोंडेवाडी येथे राहते. तिची आरोपी तेजस सांबरी याच्याशी ओळख कर्जत तालुक्यातील आषाणेवाडी येथे एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांमध्ये संपर्क वाढला आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
आरोपी अधूनमधून सोंडेवाडी येथे येत असे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्याने लग्नाचे आमिष दाखवत मुलीला भेटण्यासाठी बोलावले आणि तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर विविध ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले.
जानेवारी 2025 मध्ये आरोपी पीडितेला आपल्या आषाणे येथील घरी घेऊन गेला. काही काळ दोघे एकत्र राहात होते. मात्र, मुलीने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर आरोपी सतत टाळाटाळ करत होता. दरम्यान, काही काळानंतर तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारीनुसार, गरोदरपणातही आरोपी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. अखेर 26 मे 2026 रोजी दुसऱ्या मुलीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत त्याने पीडितेला घराबाहेर काढले. त्यानंतर पीडिता व तिच्या कुटुंबियांनी खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच खालापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील आषाणेवाडी येथे कोणतेही मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसतानाही पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले.
याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पॉक्सो अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे, पोलीस हवालदार सोनावणे व शेवाळे पुढील तपास करीत आहेत.
