आरोपीविरोधात गुन्हा दाखल
| खास प्रतिनिधी | रायगड |
तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर अजबसिंग गिरासे, रा. रिसगाव याने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला. या तरुणीने लग्न करण्याबाबत गिरासेकडे सातत्याने मागणी केली. परंतु, तो ऐकत नसल्याने पीडित तरुणीने त्याच्या घरच्यांनाच आपबिती सांगितली. गिरासेला लग्न करण्यास सांगावे, अशी मागणीदेखील तिने केली. मात्र, भगवान गिरासे आणि सोमेश्वरची आई रेखाबाई गिरासे यांनी पीडित तरूणीला शिवीगाळ केली आणि लग्न लावून देण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडित तरूणीने रसायनी पोलीस ठाण्यात सोमेश्वर अजबसिंग गिरासे, भगवान गिरासे, रेखाबाई गिरासे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर हे तपास करीत आहेत.






