रघुजीराजे आंग्रे, ॲड. मानसी म्हात्रे यांची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पुणे येथील रमेश भिडे या व्यक्तीने सोशल मीडियावर महापुरुषांचा अवमान केला. याविरोधात रघुजीराजे आंग्रे आणि अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांची भेट घेऊन संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत त्यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
रमेश भिडे नामक व्यक्तीने फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत नुकतीच एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची धुरा सांभाळणारे सरखेल कान्होजी राजे आंग्रे व आंग्रे घराण्याबद्दलदेखील बदनामी केली आहे. विश्वरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलदेखील अतिशय खालच्या पातळीवर व अर्वाच्य भाषेत या भिडेने पोस्ट केली.
याबाबत रघुजीराजे आंग्रे यांनी तातडीने सर्व माहिती गोळा करून या भिडेविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे ठरविले. अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आणि रघुजीराजे आंग्रे यांनी गुरुवारी (दि.16) अलिबाग पोलीस ठाणे गाठले. महापुरुषांचा अपमान करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या रमेश भिडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार अर्ज देण्यात आला. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी तात्काळ याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.







