| रायगड | प्रतिनिधी |
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जात असली तरी नवमतदारांची नोंदणी ऑक्टोबर 2024 नंतर होऊ शकलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात ज्या तरुणांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली त्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
भारतीय निवडणूक आयोगाने याबाबत सुधारित परिपत्रक न काढल्याने हा घोळ झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने नव मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 करीता जन्मतारखेची 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीलाच ही नोंदणी करता येणार आहे. ही मर्यादा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरवण्यात आली होती. मात्र विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर ही मर्यादा अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2024 नंतर ज्या युवकांनी आपल्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांच्या नावांची नोंदणीच होत नसल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना येत्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.
दरम्यान, मतदार यादी तयार करताना चार पात्रता दिनांक ग्राह्य धरावे. त्यात 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांची मर्यादा देण्यात आली आहे. यानुसार दर तिमाहीत एक सारांश पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. परंतु 2024 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्याने पुढील निवडणुका लागेपर्यंत त्याची आवश्यकता नसल्यामुळे हे परिपत्रक अद्ययावत करण्यात आले नसल्याचे आढळून आले आहे, असे भारत निवडणूक आयोगाने 12 जुलै 2022 रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.







