। सारळ । वार्ताहर ।
होळीचे शोलेमधील गाणे असो नाहीतर आज गोकुळात रंग खेळतो हरी असो या गाण्यांनी पूर्वी होळीचा रंग परिसरावर पंधरा दिवस अगोदरच चढू लागायचा. त्यानंतर आरोळ्या, हळी, गाणी, खेळ यांचे पडसाद परिसरात घुमू लागायचे. सध्या मात्र होळीचा दिवस जवळ येऊनही होळीची वातावरणनिर्मिती पूर्वीप्रमाणे नसल्याची परिस्थिती खरिपाट परिसरात दिसत आहे.
पूर्वी होळीच्या पंधरा दिवस आधीपासून होळी निमित्ताने खरीपाट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण होत असे. त्यातही रस्त्यावरच आटयापाटयाचे मैदान आखून गोंगाट करत रात्रीचा रंगणारा हा खेळ, मुली व महिला एकत्रित येऊन होणारी फेराची गाणी आता कालबाह्य झाल्याचे दिसत आहे. बोटावर मोजण्या इतकाच ठराविक गावांमधून आटयापाटयाचा खेळ शिल्लक राहिला आहे. त्यातही सर्वात आकर्षण असणारा खेडेगावातील बहुरूपी होऊन सोंग काढण्याचा खेळ आजच्या तरुणपिढीला माहित नसणारा झाला आहे. त्यामुळे होळीतील चांगल्या परंपरा आपण कुठे तरी हरवत चाललो आहोत, अशी भावना जेष्ठ महिलांकडून व्यक्त केली जात आहे.