महिला टी-20 विश्‍वचषकाच्या आयोजनास नकार- जय शहा

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांच्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला विचारणा केली होती. मात्र, आपण हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितले.

महिलांची ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धा या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशात नियोजित आहे. मात्र, सध्या तेथील सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आयसीसीला यजमानपदासाठी अन्य पर्यायांचा विचार करणे भाग पडले आहे. महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत आयसीसीने बीसीसीआयला विचारणा केली. मात्र, मी स्पष्ट नकार दिला. आपल्याकडे त्या काळात (ऑक्टोबरमध्ये) मान्सून सुरू असेल. तसेच पुढील वर्षी महिलांची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धाही भारतात होणार आहे. त्यामुळे सलग दोन विश्‍वचषकांचे आयोजन करण्यास मी उत्सुक नव्हतो, असे शहा यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version