17 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने जाहीर केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) काही आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत बीसीसीआयला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विश्वचषक अमिरातीत खेळवणेच सर्वांच्या सोयीचे ठरेल, याची बीसीसीआयला कल्पना होती. आता इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित हंगामदेखील अमिरातीत होणार आहे.
विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र गांगुलीने अद्याप याविषयी काहीही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले. आयसीसीशी आमचा संवाद सुरू असून लवकरच विश्वचषकाच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात येतील. आयपीएल संपल्यानंतर विश्वचषकापूर्वी खेळाडूंसह आयोजकांना किमान एका आठवड्याचा अवधी मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे गांगुलीने नमूद केले.
भारताचे खेळाडू 15 सप्टेंबपर्यंत दुबईत
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर 15 सप्टेंबपर्यंत सर्व भारतीय खेळाडू दुबईत दाखल होतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. आयपीएलच्या 14व्या हंगामातील उर्वरित 31 सामने अमिरातीत होणार असून, त्यानंतर आठवड्याभरात विश्वचषकाला प्रारंभ होईल, असे अपेक्षित आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देशातील स्थितीचा आम्ही आढावा घेतला. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही कायम असल्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषक अमिरातीत खेळवण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही स्पर्धा भारताबाहेर खेळवण्याचे आम्ही ठरवले असले तरी स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयच भूषवणार आहे.
- सौरव गांगुली, अध्यक्ष, बीसीसीआय