| नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथील सी.एस.आर. विभाग तसेच रिलायन्स हेल्थ केअर सेंटर मधील डॉक्टर्स यांच्या पुढाकाराने कुपोषित बालकांसाठी झिरो मिशन प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या, कुपोषण मुक्त मोहिमेचे दोन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ही मोहीम आता पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्याने परिसरातील कुपोषित बालकांवर योग्य उपचार करत परिसर कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन एच आर विभागाचे मुख्य अधिकारी गौतम मुखर्जी यांनी केले.
नागोठणे बीट- 1 व 2 मधील कुपोषित बालकांना, मुलांना येथील अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने शोधून त्यांना कुपोषित मुक्त करण्याच्या हेतूने मण्युफॅक्चरींग डीविजन व एकात्मिक बाल विकास प्रकल्प (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या झिरो मिशन प्रकल्पांतर्गत नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषण मुक्त मोहिमेच्या तिसर्या टप्प्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गौतम मुखर्जी, डॉ मिलिंद धात्रक, डॉ.अंकिता मते-खैरकर, डॉ. अभय ससाणे, डॉ. आदित्य शिरसाट, रमेश धनावडे, डॉ.प्रशांत बरदोलोई, वरदा कुलकर्णी तसेच परिसरातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
नागोठणे बीट 1 व 2 मधील एकूण 118 कुपोषित बालकांची नोंद असलेल्या बालकांवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र यावेळी सुमारे 77 बालकांची तपासणी करून त्यांना फूड सप्लीमेंट, योग्य औषधे देण्यात आले. यावेळी डॉ.अंकिता मते-खैरकर यांनी कुपोषण संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान अलिबाग येथील जिल्हा तसेच कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांवर योग्य ते उपचार करून घ्यावेत असा सल्ला डॉ.अंकिता यांनी दिला. दर महिन्याच्या दुसर्या शुक्रवारी कुपोषित मुक्त मोहिमेच्या माध्यमातून कुपोषित बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सी.एस.आ.र विभागाच्या श्रीमती कुळकर्णी यांनी दिली.