| मुंबई | प्रतिनिधी |
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून, यासाठी खास 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत एसटी बस उपलब्ध असणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
गणेशोत्सव 2025 ची तयारी म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पाच हजार अतिरिक्त बससेवा सुरू करणार आहे. या अतिरिक्त बसेससाठी आरक्षण करण्यासाठी अधिकृत वेबसाइट (npublic.msrtcors.com), बस डेपो किंवा एसटीचा मोबाईल ॲपवरून करता येईल. या विशेष बसेस मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर महत्त्वाच्या केंद्रांवरून सोडण्यात येणार आहेत. गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होणार असून, त्यावर प्रवाशांना भाडे सवलती मिळणार आहेत.
22 जुलैपासून आरक्षण करता येणार
या जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणाची सोयही उपलब्ध असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तिकीट दरात सवलत मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षणाची प्रक्रिया 22 जुलैपासून सुरू होत आहे.
वाहनदुरुस्ती पथकंही तैनात असणार
येत्या 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून जादा बसेस कोकणासाठी सुटतील. गेल्या वर्षी 4300 बसेस सोडण्यात आल्या होत्या, त्या तुलनेत यंदा 700 बसेसची वाढ करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी बसस्थानके आणि बसथांब्यांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील महामार्गांवर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथके (ब्रेकडाऊन व्हॅन) देखील तैनात करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.