नेरळ नळपाणी योजनेस दिलासा

जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांचा यशस्वी पुढाकार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना थकीत वीज देयकांमुळे अडचणीत सापडली होती. वीज बिल थकल्याने कोणत्याही क्षणी वीज जोडणी खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांनी पुढाकार घेत यशस्वी मध्यस्थी करत नळपाणी योजना सुरळीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामपंचायतीकडून महावितरणकडे 20 लाख रुपये जमा करण्यात आल्याने वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे.

नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना ही थकीत वीज देयकांमुळे सतत चर्चेत होती. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू असताना नेरळच्या पाणीपुरवठा योजनेचीही जोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डिझेलवर मोटार चालवून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे व पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेत आर्थिक तोडगा काढण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर सुनीता मोरे यांनी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांची भेट घेऊन प्रशासक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी नळजोडण्यांबाबत कठोर भूमिका घेऊन थकबाकी कमी करण्याचे, तसेच मिळणाऱ्या निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन भागविण्याचे निर्देश देण्यात आले.

ग्रामस्थांना प्रशासनाच्या त्रुटींचा फटका बसू नये, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांनीही संबंधितांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने महावितरणकडे 20 लाख रुपयांची थकबाकी भरली असून उर्वरित देयके टप्प्याटप्प्याने भरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या सकारात्मक हस्तक्षेपामुळे नेरळ गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सुटली असून, नागरिकांनी सुनीता मोरे यांच्या ठाम आणि समन्वयक भूमिकेचे कौतुक केले आहे.

Exit mobile version