| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या अप्पासाहेब वेदक म्हणजेच देहरंग धरणाच्या सांडव्यावरून गुरुवारी (दि.23) पहाटेपासून पाणी वाहू लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने निर्माण झालेली पाणीटंचाईची चिंता यामुळे काही प्रमाणात कमी झाली आहे. धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरण भरू लागल्याने पनवेलकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, एका बाजूला धरण तुडुंब भरून वाहत असताना दुसऱ्या बाजूला शेजारील वाडीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वेदनादायी वास्तव समोर आले आहे.
देहरंग धरणाची पाणीसाठा क्षमता 3.125 घनलक्ष मीटर आहे. पनवेल शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या धरणाचा उपयोग केला जातो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे धरणातील पाणीसाठा अपुरा पडू लागल्याने पनवेल महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडून अतिरिक्त पाणी घ्यावे लागत आहे. या धरणातून दररोज सुमारे 16 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उपसा केला जात होता. मागील महिनाभर धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणक्षेत्र कोरडे पडले होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना महापालिकेला विशेष उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. सध्या धरणात आलेल्या पाण्यामध्ये मातीच्या गाळाचे प्रमाण अधिक असल्याने सांडव्यावरील दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. गाळयुक्त पाणी वाहून जाऊन स्वच्छ पाणी धरणात साठावे, असे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर धरणात पाणीसाठा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात धरणातील अपुरा पाणीसाठा आणि एल निनोच्या प्रभावामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पनवेल महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. आता धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकीकडे जुलैच्या सुरुवातीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या देहरंग धरणाने गुरूवारी ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली असून, पनवेलकरांच्या पाणीपुरवठ्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. मात्र, याच धरणालगत असलेल्या कोंडाची वाडीतील आदिवासी नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या वाडीतील पिण्याच्या पाण्याच्या मशिन्स दोन दिवसांपासून बिघाड अवस्थेत असून, पिण्याचे पाणी वाहून नेणारे जलवाहिन्यांदेखील गळती लागली आहेत. त्यामुळे येथील महिलांना डोंगर उतरत खाली असलेल्या विहिरीवर जावे लागत आहे. तेथून पाण्याने भरलेले दोन ते तीन हंडे डोक्यावर घेऊन आडव्या-उभ्या वळणाच्या चढणीच्या वाटेने घरी परतावे लागत आहे. त्यामुळे त्यांची मोठी कसरत होत आहे. मुसळधार पावसातही हा संघर्ष कायम असून, महिलांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे. एका बाजूला धरण तुडुंब भरून वाहत असताना दुसऱ्या बाजूला शेजारील वाडीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे वास्तव वेदनादायी आहे. संबंधित यंत्रणा तातडीने दुरुस्त करून कोंडाची वाडीतील नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.






