एसटीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा

मोफत प्रवासासोबत डिजिटल एनसीएमसी कार्ड

| रायगड | प्रतिनिधी |

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या मोफत प्रवास सवलतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. पारंपरिक पास प्रणालीऐवजी आता ‘रुपे ऑन द गो’ सक्षम राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असून, यामुळे प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल होणार आहे.

एसटी महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पत्नीच्या मोफत प्रवास सवलतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, सेवानिवृत्त कर्मचारी, तसेच अपघातग्रस्त किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी/पतींनाही एप्रिल 2026 पासून वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. एसटीच्या विविध बससेवांमधून प्रवास करताना केवळ नाममात्र फरकाची रक्कम भरून ही सवलत मिळवता येणार आहे.

एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया राज्यभरातील आगारांमध्ये अधिकृत दलालामार्फत राबवली जाणार असून, ही यंत्रणा एनएसडीएल पेमेंट बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित केली जाईल. या डिजिटल कार्डमुळे प्रवाशांची ओळख पटवणे, सवलतींचा वापर आणि व्यवहार प्रक्रिया अधिक वेगवान व सोपी होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून या डिजिटल प्रणालीचा स्वीकार करणे आवश्यक ठरणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार, मोफत प्रवास पास प्रणाली अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक बांधिलकी जपत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देतानाच डिजिटल व्यवहार प्रणालीचा प्रसार करण्याचे दुहेरी उद्दिष्ट या निर्णयातून स्पष्ट होत आहे. या उपक्रमामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी सेवा देणारी संस्था न राहता, आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार करणारी आणि आधुनिक बदल स्वीकारणारी सक्षम संस्था म्हणून पुढे येत असल्याचे अधोरेखित झाले आहे, असे एसटी महामंडळाद्वारे सांगण्यात आले.

Exit mobile version