चवळी लागवडीतून शेतकर्‍यांना दिलासा

| तळा | वार्ताहर |
दव आणि जमिनीच्या ओलाव्यावर गिरणे परिसरात तयार होणार्‍या कडधान्याला जिल्हाभरातून चांगली मागणी आहे. तळा तालुक्यातील गिरणे गाव हे तळा, इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चळवळीसाठी प्रसिध्द असणार गाव आहे. या गावात पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने चळवळीचे पीक घेतले जात आहे. यावर्षी अंदाजे 32 हेक्टर वर शेतीमध्ये गिरणे गावातील शेतकर्‍यांनी चवळीची लागवड केली आहे.

या चवळीचे वैशिष्ट्ये म्हणजे इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती या चवळीची आहे. हे गाव खाडीकिनारी असल्याने खाडीवजा वरकस जमिनीत या चवळीची लागवड केली जाते. येथील मेहनती शेतकरी चवळी बरोबरच वाळ, मुग, व तुरीची शेती सुद्धा करतात. त्यामुळे चवळीच्या पिकाला हे पूरक पीक ठरत आहे. येथील शेतकर्‍यांशी चवळीच्या शेती विषयी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये शेतीची नांगरणी करून त्यात काही प्रमाणात शेणखत टाकून मग चवळीची लागवड केली जाते. लागवड केलेली ही चवळी आता जोमाने वाढायला लागली आहे. काही दिवसांनी या चवळीला फुटवा फुटून मोठे रोपे होतील. त्यांना फुले लागून जानेवारी फेब्रुवारी मध्ये चवळीच्या शेंगा लागण्यास सुरुवात होईल. पहिला बहर काढल्यानंतर पुन्हा शेंगा लागतील व दुसरा बहर काढला जाईल. या शेंगा पूर्ण पिकल्यानंतर काढून त्या उन्हात सुकवुन त्यातून चवळी काढली जाते. अनेकवेळा कृषी अधिकार्‍यांचेही शेतकरी मार्गदर्शन घेतात व या पिकाला योग्य प्रमाणात कीटकनाशके, खत मारतात तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. एका एकरात अडीज ते तीन क्विंटल चवळी पीक होते. येथील शेतकरी जास्तीतजास्त पाच क्विंटल पर्यंत चवळीचे पीक घेतो.

त्यामुळे या चवळीच्या पिकांमुळे चांगले उत्पन्न येथील शेतकर्‍यांना मिळत आहे. येथील शेतकरी चवळी पासून जास्तीतजास्त 40 हजार ते कमीतकमी 10 हजार पर्यंत चवळीचे उत्पन्न घेत आहेत. तळा तालुक्यातील गिरणे गावाला लाभलेली खाडी व वरकस जमीन त्या जमिनीत चवळीसाठी असणारे पोषक वातावरण यामुळे येथे चवळीचे पीक जोमाने येत असून हे गाव पूर्वीपासून चवळीसाठी प्रसिध्द झाले आहे.

Exit mobile version