जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदत वाढ
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अभियांत्रिकी, वैद्यकिय व इतर व्यावसायिक शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये हे प्रमाणपत्र सादर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ करण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षण घेणार्या एसईबीसी, इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांची गेल्या दोन महिन्यांपासून हे प्रमाणपत्र काढण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापासून जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यापर्यंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांची लगबग सुरु आहे. जिल्ह्यातील जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयात इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी)चे सुमारे साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल आहेत. मात्र, हे प्रमाणपत्र मुदतीमध्ये शिक्षण संस्थेत दाखल न झाल्यास प्रवेश रद्द होण्याची भिती निर्माण झाली होती. यामुळे शासनाने अभियांत्रिकी, वैद्यकिय आणि इतर व्यावसायिक शिक्षण घेणार्या एसईबीसी, ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. यासाठी सहा महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. शासनाने त्यानुसार परिपत्रक काढले आहे.