तळ्यातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर रखडले

प्रशासनाचा शहरवासीयांच्या जीवाशी खेळ; तळा नगरपंचायत प्रशासनाचा ढिम्म कारभार

| तळा | प्रतिनिधी |

तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, कित्येक वर्षांपासून करण्यात येणाऱ्या या डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर अद्यापही रखडलेल्या अवस्थेत असल्याने तळा नगरपंचायत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराबाबत तळा शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केली आहे. शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो. मात्र, या डम्पिंग ग्राऊंड सभोवती संरक्षक भिंत न बांधल्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे व पक्ष्यांद्वारे तो पसरला जात आहे. यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जवळच तहसिल कार्यालय असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच डम्पिंग ग्राऊंड शेजारीच निम्म्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बोअरवेल मारण्यात आली आहे.

डम्पिंग ग्राऊंडवर टाकलेला हा कचरा कुजून घाण पाणी जमिनीत मुरले जात असल्याने याचा परिणाम मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाकडून शहरवासीयांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर शहरातील आंबेळी येथे नगरपंचायतीच्या मालकी हक्क असलेल्या जागेत होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगितले गेले होते. त्यानुसार त्या ठिकाणी काम ही पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही धरणा शेजारीच शहरातील कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या बिकट होत चालली असून, सदर डम्पिंग ग्राऊंड लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आरोग्याचा गंभीर प्रश्न
सध्या ऊन-पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे डेंग्यू , मलेरियासारख्या साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन ठिकठिकाणी साचलेला कचरा तत्काळ उचलावा आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणी ही केली जात आहे.

तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंड सध्या धरणाशेजारी असून, ते अंबेळी येथे स्थलांतरित करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. आंबेळी येथे नविन डम्पिंग ग्राऊंडचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील सर्व ओला व सुका कचरा गोळा करून या ठिकाणी त्याचे संपूर्ण विघटन करण्यात येणार आहे.

मनिषा वजाळे
मुख्याधिकारी
Exit mobile version