म्हसळा ग्रामीण रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी

। म्हसळा । वार्ताहर ।

रुग्णांना प्रसन्न वातावरणात योग्य उपचार व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने कायाकल्प पुरस्कार योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही यामध्ये सहभागी झाली होती. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अंतर्गत असलेल्या 62 आरोग्य दालनांना 2023-24 चा कायाकल्प पुरस्कार आणि रोख रक्कम बक्षीस जाहीर झाले. यामध्ये 43 आरोग्यवर्धिनी, 10 प्राथमिक आरोग्य मंदिर, 5 उपजिल्हा रुग्णालय, तर 4 ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे म्हसळासारख्या ग्रामीण, डोंगराळ आणि दुर्गम भागातील म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश झाला असून म्हसळा ग्रामीण रुग्णालयास एक लाखाचे रोख बक्षीस जाहीर झाले असून हि बाब निश्‍चितच उल्लेखनीय आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

15 मे 2015 पासून कायाकल्प पुरस्कार देण्यात येत आहेत. योजनेत सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी यांना सहभागी होता येते. पुरस्कारासाठी रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, खाट स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचार्‍यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, जैववैधकीय घन व द्रवरूप कचर्‍यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण देण्यात येतात. 2023-24 मध्ये आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुष्यमान मंदिर, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांचे परीक्षण करण्यात आले होते.

या योजनेअंतर्गत आरोग्य यंत्रणेचे चार टप्प्यामध्ये परीक्षण करण्यात येते. यामध्ये प्रत्यक्ष मुलाखत, रेकॉर्ड आढावा, प्रत्यक्ष रुग्णांशी चर्चा घेण्यात येतात. आरोग्य संस्था प्रमुख व तेथील कार्यरत कर्मचारी यांचे मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकन टक्केवारी 70 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आली तर राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यात येते. या मूल्यांकनानुसार पुरस्कार जाहीर केले जातात. जिल्ह्यातील वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील माझे सर्व सहकारी कर्मचारी वर्ग यांच्या मेहनतीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

– डॉ. महेश मेथा, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय म्हसळा

Exit mobile version